Last Updated:
Deaths in Local Train Accident :मायानगरीचं एक धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. नोकरी किंवा व्यवसाय करण्यासाठी मुंबईत आलेल्या अनेकांचा लोकलमधून पडून जीव गेला आहे.

Deaths in Local Train Accident : भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत दरवर्षी लाखो लोक येत असतात. प्रत्येकजण काही ना काही स्वप्न घेऊन मुंबईत येत असतो. मागील काही वर्षांत मुंबईत येणाऱ्या लोकांचा लोंढा अधिकच वाढला आहे. पण मुंबईनं सर्वांना सामावून घेतलं. अनेकांची स्वप्न पूर्ण केली. पण आता या मायानगरीचं एक धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. नोकरी किंवा व्यवसाय करण्यासाठी मुंबईत आलेल्या अनेकांचा लोकलमधून पडून जीव गेला आहे. यातील १५ हजार जणांची अद्याप ओळखच पटली नसल्याचं समोर आलं आहे.
गेल्या १५ वर्षांत मुंबईतील विविध रेल्वे मार्गांवर मृत्युमुखी पडलेल्यांपैकी जवळपास एक तृतीयांश मृतांचे मृतदेह बेवारस राहिले आहेत, अशी धक्कादायक माहिती अधिकारात दिलेल्या उत्तरात समोर आली आहे. २००९ ते २०२४ या कालावधीत उपनगरीय रेल्वे मार्गावर रेल्वे अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या १४,००० हून अधिक आहे. यात मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गांवर सीएसएमटी ते कसारा आणि खोपोली, हार्बर मार्गावर सीएसएमटी ते पनवेल आणि पश्चिम रेल्वे मार्गावर चर्चगेट ते डहाणू या मार्गांचा समावेश आहे.
२००९ ते २०२४ या कालावधीत ट्रेनमधून पडून किंवा रुळ ओलांडून मृत्युमुखी पडलेल्या एकूण ४६,९६९ लोकांपैकी ३१ टक्के म्हणजेच १४,५१३ लोक हे असे लोक आहेत, ज्यांची मृत्यूनंतर ओळख पटली नाही. विशेष म्हणजे जीआरपीने त्यांच्या कुटुंबीयांना शोधण्याचा अथक प्रयत्न केला. तरीही पोलिसांना त्यांच्या कुटुंबीयांचा शोध घेता आला नाही. या सगळ्या लोकांची मृत्यूनंतर बेवारस म्हणूनच नोंद झाली आहे. मुंबईतील डॉक्टर डॉ. सरोश मेहता यांनी आरटीआयद्वारे ही माहिती मागवली होती.
डॉ. मेहता यांना आरटीआय अर्जाद्वारे मिळवलेल्या माहितीनुसार, २०१९ पासून बेवारस मृतदेहांची संख्या वाढत आहे. साधारणपणे, गेल्या तीन वर्षांत दरवर्षी मृतांची संख्या सुमारे २,५०० इतकी झाली आहे. जी मागील दशकांमधील ३,४००-३,७०० वरून लक्षणीय घट आहे. आकडेवारीवरून असे दिसून येते की २०१२ पासून दरवर्षी एकूण मृतांची संख्या कमी होत आहे. २०२२ हा एकमेव अपवाद आहे. जेव्हा कोरोना संसर्गामुळे लोक घरी अडकलेले होते. लोक लोकलमधून प्रवासच करत नव्हते, त्यामुळे मृतांचा आकडा कमी झाला होता.
खरं तर, रेल्वे अपघातातील बळींची ओळख पटवणे आव्हानात्मक असते. कधीकधी अपघातात मृतदेहाची अवस्था अत्यंत वाईट झालेली असते. त्यामुळे ओळख पटवता येत नाही. बऱ्याचदा अशा मृतांकडे फोन किंवा ओळखपत्रे यांसारख्या वस्तू सापडत नाहीत, अशा स्थितीत मृतांची ओळख पटवणं आव्हानात्मक असतं, अशी माहिती पोलिसांनी दिली.
Mumbai,Maharashtra
June 23, 2025 8:07 AM IST








